Sunday, April 11, 2021

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी ....???

मुलांना काय घडवताय, 
गरुड की पोल्ट्रीची कोंबडी ....???
--------------------------------
एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.

बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते. 

पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही. 

याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची. 

कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. 
पालकांनो स्वत:ला विचारा !!!!!

तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?

Gudhipadwa Story (गुढीपाडवा)

गुढी पाडव्याची बापूंनी सांगितलेली कथा 

हरि ॐ 

" गुढीपाडवा " ज्या दिवसाची वाट पाहत, श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस . ज्या दिवसाची वाट पाहत, भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस. ज्या दिवसाची वाट पाहत, चौदावर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे संन्यासी जीवनव्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस . प.पू. अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा सांगितली होती.


 हरि ॐ 

ज्याक्षणाची वाटपहात सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांनी आनंद बहरत होता. सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम ,माता सीता, लक्ष्मणासह ,सुग्रीव आणि समस्त वानार्सैनिकांसाहित परत आले होते. हनुमंत भक्तश्रेष्ठ भरताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहचले होते. राजमहालात पोहचल्यावर सर्वांचेच जोरदार स्वागत झाले. श्रीरामचंद्रानी राजमहालातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले. नंतर श्रीराम मातासीतेसह लक्ष्मण,भरत, आणि हनुमंत अयोध्येतून फेरफटका मारावयास निघाले. 

चौदा वर्षे संयासाप्रमाणे जीवन जगणारी अयोध्या नगरी आज विविध रंगांनी नटलेली होती . विविध रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजलेले होते .सर्व अयोध्या वासियांनी आपल्या लाडक्या श्रीरामचंद्राच्या स्वागतासाठी रंगबेरंगी वस्त्रांची गुढी दारात उभारली होती . सर्व अयोध्या वासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पंचायतन सुखावत होते, आशीर्वाद देत होते. 

अयोध्येचे हे सौंदर्य न्याहाळताना लक्ष्मणाची नजर एका गुढीवर गेली.जी गुढी फक्त साध्या,जुन्या वस्त्राची उभारली होती . त्यावर लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले ," बंधू ! ती गुढीच फक्त का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे?" त्यावर श्रीराम म्हणाले ,"चला आपण त्या घरात जाऊन पाहूयात." 

पंचायतन त्याघरी पोहचल्यावर त्या घरातील सर्वांना अतिशय आनंद झाला . पंचायत्नाच्या स्वागतासाठी सर्वांची एकाच लगबग उडाली . श्रीरामचंद्रा बरोबरील सर्वांचे त्यांनी योग्य रीतीने स्वागत केले.
सर्वांचे क्षेमकुशल विचारून श्रीरामचंद्रांनी प्रश्न केला ," फक्त आपल्या घरासमोरील गुढी का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे ?" यावर त्या घरातील एक व्यक्ती म्हणाला " देवा,आपण येणार म्हणून आम्ही सर्वजण आनंदून गेलो होतो. पण आमच्या घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती खूपच आजारी होती म्हणून दुखी होतो . मनोमन तुमची प्रथांना करत होतो कि त्यांना तुमचे दर्शन होवो. पण त्यांनी त्यांची अखेरची घटिका ओळखली होती .त्यांनी घरातील सर्वांना जवळ बोलावून घेतले व म्हणाले,' मला काही श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही असे वाटते. माझ्याकडे आता मोजकेच श्वास शिल्लक आहेत . तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही शोक करत बसू नका.त्याऐवजी श्रीरामचंद्राच्या स्वागतात आनंदाने सहभागी व्हा..' 'माझी फक्त एकच इच्छा आहे ,तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी जी गुढी उभाराल ती मात्र ह्या वस्त्राने उभारा , कारण श्रीराम जेव्हा अयोध्येतून निघाले होते तेव्हा त्यांची चरण धूळ या वस्त्रामध्ये मला 'कृपाशीर्वाद' म्हणून मिळाली होती.' " 

सर्वांचे डोळे पाण्याने भरले .श्रीरामांच्या चेहऱ्यावर अतीव करुणा दाटली होती. ते गुढी जवळ गेले व त्यांनी आपल्या कंबरेचा शेला काढला आणि त्या गुढीवर लावला व त्या गुधीवरील ते जुने वस्त्र आपल्या कंबरेला बांधले.तो क्षण सर्वांच्या मनाला मोहून गेला.तो क्षण श्रीरामचंद्राची त्यांच्या भक्तांबध्ल असणार्या प्रेमाची साक्ष देत होता. त्यानंतर सर्वजण राजमहालात परत आले. 

आता सर्व वानार्सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम माता सीतेने आखला होता.त्यानुसार सर्वाना भेटवस्तू, त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. शेवटी हनुमंताची वेळ आली .आता माता सीतेला प्रश्न पडला कि हनुमंताला कोणती भेट द्यावी? त्यावर त्यांनी हनुमंतालाच विचारले,"तात! आपणाला आम्ही कोणती भेट द्यावी? " त्यावर हनुमंत म्हणाले , "माते, श्रीरामांनी मला सर्व काही दिले आहे . पण तू म्हणतेच आहेस तर मला आज एका गोष्टीचा मोह होतोय, 'श्रीरामांनी त्यांच्या कंबरे भोवती बांधलेल्या त्या जुन्या वस्त्राचा.' " त्यावर माता सीतेने स्वतः ते जुने वस्त्र श्रीरामांच्या कंबरेचे काढले आणि हनुमंताच्या कंबरेला बांधले. 

भक्तांच्या प्रेमा पेक्षा त्यांच्यावर दुप्पट प्रेम करणाऱ्या श्रीरामांचा आणि हनुमंताचा सर्वांनी जयजयकार केला.

 "प.पू .बापू त्यावेळी म्हणाले होते कि," ही कथा जो कुणी गुढी पाडव्याच्या दिवशी स्मरण करेल त्याला काय मिळेल ते मी आता सांगणार नाही." 

!! हरिओम !!